अमळनेरच्या मध्यवर्ती भागात गायींची धाडसी चोरी
स्विफ्ट डिझायरमधून दोन गायी लंपास!
मराठा मंगल कार्यालयाजवळ चोरट्यांचा धुमाकूळ; शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

अमळनेर : शहरात चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत असतानाच आता जनावरांच्या चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील मध्यवर्ती आणि भरवस्तीच्या परिसरात असलेल्या मराठा मंगल कार्यालयाजवळून एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून चक्क दोन गायी चोरून नेण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, यश वर्मा यांच्या मालकीच्या दोन गायी १८ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे २:३० ते २:४० वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्या. चोरट्यांनी या चोरीसाठी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, भरवस्तीच्या परिसरात घडलेला हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारे वाहनाचा वापर करून दोन गायींची चोरी होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. चोरट्यांनी पहाटेच्या वेळेचा फायदा घेत ही चोरी केल्याचे समोर येत असून, अशा घटनांमुळे शहरातील पशुधनाच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या मते, चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
रात्रीच्या पोलीस गस्तीवर प्रश्नचिन्ह!
शहरातील मुख्य आणि मध्यवर्ती भागातच चोरीची घटना घडत असल्याने रात्रीच्या पोलीस गस्तीबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी संशयास्पद वाहनांची तपासणी, संवेदनशील भागांमध्ये नियमित गस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणी
या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित पांढऱ्या स्विफ्ट डिझायर कारचा शोध घेऊन वाहन क्रमांक, संशयित व्यक्ती आणि त्यांच्या हालचालींची तपासणी करावी. तसेच चोरीस गेलेल्या दोन्ही गायींचा तातडीने शोध घेऊन त्या मालकाला परत मिळवून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अमळनेर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा तातडीने छडा लावावा आणि शहरातील रात्रीची गस्त अधिक कडक करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भरवस्तीतील रस्त्यांवरून चारचाकी वाहनातून गायींची चोरी होऊ लागली असेल, तर शहरातील नागरिक आणि पशुधन किती सुरक्षित आहेत? हा प्रश्न आता अमळनेरकरांना सतावत आहे. म्हणून पोलिसांनी तातडीने कारवाई करून या चोरीचा उलगडा करावा, हीच नागरिकांची अपेक्षा!
