रानडुकरांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात
अमळनेर : तालुक्यातील खेडी व्यहारदळे परिसरात वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रविवारी रात्री खेडी व्यहारदळे येथील शेतकरी संदिप मधुकर पाटील यांच्या शेतात रानडुकरांनी घुसून सुमारे चार बिघे क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रानडुकरांसह इतर वन्यप्राण्यांकडून वारंवार नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शेतीवरच उपजीविका अवलंबून असताना वन्यप्राण्यांमुळे होत असलेल्या नुकसानीचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच रानडुकरांचा शेतात होणारा वारंवार प्रवेश रोखण्यासाठी कायमस्वरूपी व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना वनविभागाने तातडीने कराव्यात. शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेऊन प्रश्न मार्गी न लावल्यास ग्रामस्थ व शेतकरी उपोषणाला बसतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
वनविभागाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा खेडी व्यहारदळे परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
