जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमळनेरमध्ये विविध उपक्रम

0
IMG-20260606-WA0005

सीडबॉल कार्यशाळा, वृक्षारोपण आणि हरित शपथ

 

अमळनेर : नगरपरिषद आणि महिला हाउसिंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छ भारत अभियान 2026 आणि माझी वसुंधरा अभियान 7.0 अंतर्गत विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांची सुरुवात दि. 4 जून 2026 रोजी इंदिरा गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या सीडबॉल बनवण्याच्या कार्यशाळेने झाली. या कार्यशाळेत सहभागी नागरिक आणि स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सुमारे 1,000 सीडबॉल तयार केले. या माध्यमातून भविष्यात हरित क्षेत्र वाढविण्याचा संदेश देण्यात आला.

त्यानंतर दि. 5 जून 2026 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ओंकार नगर येथे ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. अमळनेर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनासाठी हरित शपथ घेतली.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित नगरसेवक, नगर परिषद अधिकारी-कर्मचारी, महिला हाउसिंग ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांना घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2026 अंतर्गत जारी करण्यात आलेल्या नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच संबंधित माहितीपत्रकांचे वाटपही करण्यात आले.

 

 

याच अनुषंगाने नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत शहरातील 1 ते 18 प्रभागांतील मुकादमांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. स्वच्छता विभाग कार्यालयात झालेल्या या कार्यशाळेत घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2026 मधील विविध नियम, जबाबदाऱ्या आणि अंमलबजावणीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सर्व मुकादमांना हरित शपथ देण्यात आली तसेच अधिनियमाची माहितीपत्रके वितरित करण्यात आली.

या उपक्रमांना नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, विविध प्रभागांतील नगरसेवक, आरोग्य सभापती, स्वच्छता विभागातील स्वच्छता निरीक्षक, शहर समन्वयक, कर्मचारी, महिला हाउसिंग ट्रस्टच्या पदाधिकारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

यावेळी नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर यांनी पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी अशा अभियानांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. तसेच “अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे,” असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!