पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे झामी चौक परिसरात 12 दिवस पाणीटंचाई

0
IMG-20260605-WA0049

माजी नगरसेवक विक्रांत पाटील आक्रमक

अमळनेर : शहरातील झामी चौक परिसरातील नागरिकांना तब्बल 12 दिवसांहून अधिक काळ पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याने संतापाची लाट उसळली होती. नगर परिषदेकडून सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान पाणीपुरवठ्याच्या मुख्य लाईनवरील व्हॉल्व्ह माती व बांधकाम साहित्याखाली बुजला गेल्याने संपूर्ण परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळा नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांची गैरसोय दिवसेंदिवस वाढत होती. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. अनेकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागले.

या प्रकरणाची माहिती मिळताच माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. विकासकामांमुळे पाणीपुरवठा खंडित झाला असेल तर त्याची जबाबदारी संबंधित विभागाने स्वीकारून तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित असताना दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याचा आरोप त्यांनी केला.

विक्रांत पाटील यांनी प्रशासनाला जाब विचारल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी बंद पडलेल्या व्हॉल्व्हचा शोध घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यानंतर सुमारे 15 व्या दिवशी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी भविष्यात अशा प्रकारची निष्काळजीपणा पुन्हा होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, एका साध्या तांत्रिक त्रुटीमुळे नागरिकांना जवळपास दोन आठवडे पाण्याविना राहावे लागणे ही नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी असल्याची चर्चा परिसरात सुरू असून, पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांबाबत प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!