महाराष्ट्राची ही लाल परी, सोडवी सर्वांना घरीदारी…….. पण ? संदीप घोरपडे
1960-70 च्या दशकात संपूर्ण महाराष्ट्राला बैलगाडीच्या प्रवासातून सुटका देत लाल परीने सर्वांना आपल्या अंगा खांद्यावर घेऊन महाराष्ट्रभर फिरविले. नव्हे, एक प्रकारे सर्वांना आपल्या अस्तित्वाचा लळाच लावला. आबालवृद्धांना आपल्या उबदार पंखांखाली घेऊन गरजेनुसार सर्वदूर अलगद नेऊन पोहोचविले. शालेय विद्यार्थ्यांना तालुक्याच्या गावी शिक्षणासाठी, खेडेगावातील मुलांना सुट्टीच्या कालावधीत मामाकडे, लग्नसराईत भल्या पहाटे दूर गावी जाण्यासाठी पहिली एसटी किंवा रात्रीच्या उशिराच्या प्रवासासाठी रात राणी या गाड्यांनी आपलं वेगळेपण जपलं. दूरगावी जाणार्या नॉन-स्टॉप गाड्या जणूकाही महाराणीच्या झोकात आपल्यासमोर निघून जाताना कधी कधी इतरांचा हेवा देखील वाटे. याच गाड्यांनी नंतर मासिक पास काढून प्रवासासाठी सोय केली तेव्हा अनेकांचे शिक्षण याच लाल परीच्या माध्यमातून पूर्ण झालीत. गावाकडे धूळ उडवत येणाऱ्या एसटीकडे सासुरवासिनी अगदी डोळ्यात प्राण आणून आपल्या भावाची वाट पाहत तर याच एसटी बसच्या प्रवासात अनेकांचे मन जुळून संसारही फुललेत.
पण,
या एसटीला प्रत्येक गावात माणसांपर्यंत पोहोचविणारे एसटी कर्मचारी, अर्थात चालक आणि वाहक किंवा एसटी बस डेपो मधील तांत्रिक कर्मचारी यांना मात्र एसटी बसच्या महामंडळाने फारसं काही समाधानकारक दिलं नाही. या कर्मचाऱ्यांना सतत प्रवास करत असताना अपघाताची भीती किंवा जीवावर टांगती तलवार सतत असते कारण एसटी बस त्यांची देखभाल, दुरुस्ती उत्तमपणे कधी झालीच नाही. संपूर्ण एसटी बस खिळखिळी झालेली असतानाही वेळेच्या आत बस पोहोचविणारे चालक आणि अंगाची लाही-लाही करणारी स्थिती असतानाही सतत एसटी बस सोबत प्रवास करणारा कंडक्टर यांच्या जीवन विमा पॉलिसीबद्दल चकार शब्द कधी महामंडळाने अथवा सरकारने काढला नाही. एवढेच नव्हे, तर आपली शरीराची हाड खिळखिळी करणाऱ्या नोकरीत कधी यांना मेडिकल बिलाच्या माध्यमातून दिलासा मिळाला नाही. वेतनही यथातथाच आहे, वेतन निश्चितीचे हमी नाही अथवा इतर क्षेत्रातील आकृतीबंधानुसार वेतन निश्चिती देखील केलेली नाही. या प्रदीर्घ प्रवासात कर्मचाऱ्यांना काही क्षण विश्रांतीचे मिळावे याकरिता विश्रांती गृह देखील सोयीसुविधायुक्त नाहीत, किंवा ग्रामीण भागात तर मुक्कामाच्या व्यवस्थेची कुठलीही सुविधा नाही. अशा प्रचंड गर्दी भरल्या प्रवासात अनेक प्रकारचे स्वभावाचे विकृतीचे प्रवासी भेटतात, त्यापैकी एखाद्या सोबत वाद झाला, भांडण झालं तर मात्र कर्मचाऱ्याला अनेक चौकशांच्या फेऱ्यातून जावे लागते. बरे, याही पलीकडे शिस्त, आवेदन कार्यपद्धती देखील इंग्रज राजवटीला शोभावी अशीच जणू काही वेठबिगारच कामाला लावलेत. गुलामीची पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आजही जणू एसटी महामंडळात याची देही याची डोळा पाहावयाला मिळते. अधिकारी वर्ग तर आम्हाला जणू न्यायालयातील न्यायाधीशांनी बजवावा तेवढाच अधिकार मिळालेला आहे अशा भ्रमात वागतात व कर्मचाऱ्यांना भेदभावाची वागणूक देऊन काही चाटुगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सवलतींचा वर्षाव करून आपल्या वर्तणुकीने असंतोषाची ठिणगी टाकत असतात. बरे, या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काल सुसंगत वागणुकीसाठी अथवा वर्तनासाठी कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षणे आयोजित करून एवढ्या मोठ्या जनसामुदायासमोर सतत आपले कर्मचारी ठेवण्याचे कसब तंदुरुस्त करण्यास आम्ही देखील महामंडळ कुठल्याही योजनांना आकार देत नाही किंवा कर्मचाऱ्यांना अधिक वेतन देऊन समाधानी देखील करीत नाही. देशभरातील सर्व संघटित असंघटित कामगारांना सातवा वेतन आयोग संपून आठव्या वेतन आयोगाची तयारी चालविली असताना आमचा एसटी कर्मचारी मात्र सातव्या वेतन आयोगाच्या स्वप्नातच आहे. मला वाटते, कोरोना काळामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी जीव गमावला, नोकरी गमावली. अनेक क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडल्या, मात्र आमची एसटी अधिकच काळात रुतत चालली. आज पर्यंत या महामंडळाला कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन सरकारशी भांडणारा अध्यक्ष मिळाला नाही, किंवा सरकारात असा एकही मंत्री आला नाही की जो या महाराष्ट्रातील जीवन वाहिनीला तंदुरुस्त करून या महाराष्ट्राच्या जनतेला अर्पण करेल, किंवा आम्हा एसटी कर्मचाऱ्यांमधून असा एकही नेतृत्वाचा धनी पुढे आला नाही जो आमच्या व्यथा वेदना जाणून त्या सरकारशी भांडून कर्मचाऱ्यांच्या पदरी पाडेल. इतर क्षेत्रातील कर्मचारी नेता देखील आमची कड घेऊन भांडताना आम्ही पाहिला नाही. आणि म्हणून एसटी अधिकाधिक मोडकळीस येत आहे. सरकारातील मंत्री आपल्या स्वार्थासाठी एसटीचे कंबरडे मोडत आहेत. लोभसमान या योजना काढून एसटीचा नफा तोट्यामध्ये परावर्तित करीत आहेत. इतर क्षेत्रात जशा खाजगीकरणाने सर्वसामान्यांच्या आर्थिक बाजूला कमकुवत केले, त्यापैकीच एक प्रवास करणे थांबणार नाही, पण एसटी बस सारखा कमी खर्चात दूरपर्यंतचा राजेशाही प्रवास कधीच होणार नाही. म्हणून एसटी आपण वाचवली पाहिजे. एसटी कर्मचारी हा आपलाच बांधव अथवा भगिनी आहेत, त्यांच्यासाठी आपण आपल्या जीवनातला काही भाग वापरून त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी काही क्षण त्यांच्यासोबत बसून विचारांचे आदान प्रदान झाले पाहिजे असे मला वाटते. एसटी कर्मचाऱ्यांना कोणीतरी आभासी व्यक्तिमत्व येते, त्यांची दिशाभूल करते. त्यामुळे एसटी महामंडळाचे, एसटी कर्मचाऱ्यांचे सोबतच सरकारचे देखील मोठे नुकसान होत आहे. याकरिता समाजातील अनेकांनी पुढे येऊन या प्रश्नात तोडगा काढावा अशी वातावरण निर्मिती करायला हवी. याकरिता मी स्वतः संदीप घोरपडे अनेकांसोबत चर्चा करायला तयार आहे. व या मार्गाने आपल्या खिशातून सहज चोरीला जाणारा पैसा वाचवायचा असेल तर आपली लाल परी चालती ठेवावी लागेल. आपल्या लाल परीला चालती ठेवणारा चालक, वाहक अथवा इतर कर्मचारी हे समाधानी असले पाहिजेत. याकरिता आपल्याला सरकार दरबारी भांडावे लागेल, आपले म्हणणे मांडावे लागेल, वेळप्रसंगी आपले रक्त सांडावे लागेल. याकरिता मी तयार आहे.
जय हो लाल परी.
श्री. संदीप घोरपडे, अमळनेर