डि ग्रृपची बोगस भरती; तीन महिन्यांचे प्रशिक्षण, २२ तरुणांचा सहभाग
रेल्वे भरती फसवणुकीचे धागेदोरे महाराष्ट्राच्या अमळनेर पासून बिहारपर्यंत
अमळनेर : नरकटियागंज (बिहार) रेल्वेत ट्रॅकमनची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली महाराष्ट्रातील दोन तरुणांकडून प्रत्येकी १० लाख रुपये घेतल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या कथित भरती फसवणूक रॅकेटचे धक्कादायक धागेदोरे समोर येत आहेत. बिहार राज्यातील नरकटियागंज-मुजफ्फरपूर रेल्वेमार्गावरील मुशहरवा हॉल्टजवळ दोन बनावट ट्रॅकमन पकडण्यात आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तपासाचा वेग वाढविला आहे.
महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील कुणाल आनंद (२१) आणि जळगाव अमळनेर येथील दिनेश बारकू धनगर (२३) यांना रेल्वेत स्पेशल स्पोर्ट्स कोट्यातून ट्रॅकमनची नोकरी देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याचा आरोप आहे. समस्तीपूर येथील शैलेंद्र सिंह याने प्रत्येकी १० लाख रुपये घेतल्याचे दोघांनी चौकशीत सांगितल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी पोलिसांकडून या दाव्याची पडताळणी सुरू आहे.
आरा येथे तीन महिन्यांचे प्रशिक्षण
धक्कादायक बाब म्हणजे नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर दोघांना आरा रेल्वे स्थानकाजवळ सुमारे तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात अटक झालेल्या दोघांसह आणखी २२ तरुण सहभागी होते, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीपत्र परत घेण्यात आल्याचेही पोलिस नोंदींमध्ये नमूद आहे.
बनावट ओळखपत्रांसह थेट रेल्वे ट्रॅकवर
नरकटियागंज येथे ड्युटी लावल्याचे सांगून या तरुणांना रेल्वे ट्रॅकच्या पाहणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांच्या ताब्यातून बनावट रेल्वे ओळखपत्रे, सुमारे चार किलो वजनाचा हातोडा, लाल-हिरवे झेंडे, बांबूच्या पट्ट्या आणि मोबाइल जप्त करण्यात आले. रेल्वे अधिकाऱ्यांकडून पडताळणी केल्यानंतर संबंधित ओळखपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. तसेच अशा प्रकारची ट्रॅकमन भरती झालेली नसल्याचेही समोर आले.
तिसरा तरुण फरार
या प्रकरणातील आदित्य महादू पाटील हा तिसरा तरुण घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी कांड क्रमांक ४१/२६ नोंदवून तपास सुरू केला आहे.
आता २२ प्रशिक्षणार्थींची चौकशी होणार?
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आरा येथे प्रशिक्षण घेणारे अन्य २२ तरुण कोण आहेत? त्यांच्याकडूनही प्रत्येकी किती रक्कम घेण्यात आली? प्रशिक्षण कोणी दिले आणि बनावट नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे कोणी तयार केली? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे अपेक्षित आहे.
रेल्वे पोलिसांकडून कथित भरती करणारे, मध्यस्थ आणि प्रशिक्षण घेणाऱ्या अन्य तरुणांची भूमिका तपासली जात असून, या प्रकरणाचे धागेदोरे अनेक राज्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र कनेक्शनमुळे जळगाव(अमळनेर)-धुळे जिल्ह्यातील तपासाकडेही लक्ष लागले आहे.
