अमळनेरच्या शाह आलम नगरातील २७ वर्षीय तरुणाला सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार
गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अमळनेर पोलिसांची कडक कारवाई
अमळनेर : शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलले असून, शाह आलम नगर परिसरातील २७ वर्षीय शेख सलीम याला तब्बल सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अमळनेर शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींवर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर अमळनेर पोलिसांनी शेख सलीम याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अमळनेर यांनी त्याला सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश पारित केला.
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते यांच्या माध्यमातून हद्दपारीचा प्रस्ताव पुढे नेला असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकातून कळवण्यात आले आहेत.
गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांची नजर
शहरात वारंवार गुन्हेगारी कृत्ये करून अशांतता निर्माण करणाऱ्या तसेच कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांची बारकाईने नजर राहणार आहे. सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अमळनेर पोलिसांनी दिला आहे.
या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण होण्याची शक्यता असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
