रक्षाबंधन मानवतेच्या नात्याची सुंदर गुंफण… सोपान भवरे
दिव्य लोकतंत्र : भारतात प्राचीन काळापासुन सणांची देणगी लाभलेली आहे. मानवाला जेव्हा समुह करुन राहण्याची निकड भासली त्यावेळी त्याने मनोरंजनासाठी व स्नेह वृद्धिंगत रहावा यासाठी सणांची निर्मिती केली. सिंधू संस्कृतीत ह्या सणांना वैज्ञानिक स्वरुप होते. एकत्रित येण्याचा मूल्य जपण्याचा उद्देश होता. पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेतली जात होती. हे विश्व कुणीतरी तयार केल्याची कल्पना मानली जात होती. जस जस विज्ञानाची प्रगती झाली त्यात संशोधनानंतर काही गोष्टी शोधल्या गेल्या. काही सण हे प्राचीन ग्रंथातून मांडलेल्या कथेवरुन पुढे सणाच्या रुपात आल्या. रक्षाबंधन हा सण महाभारतातील द्रौपदी व श्रीकृष्ण यांच्या भाऊ बहिणीच्या नात्यावरुन आले अशी अख्यायिका आहे. बली,लक्ष्मी, विष्णू यांचीही कथा सांगितली जाते.
खर पाहता आपल्या नात्यातील एक पवित्र नातं हे भाऊ बहिणीचे असते. मानवाच्या भावनांचा जसा विकास होत गेला त्यात त्याला नात्याची गुंफण करावीशी वाटली. त्या नात्यात ओलावा आहे. विनयशीलता, प्रेम, आपुलकी, स्नेह, सहृदयता आहे असे नाते त्याने जपले. हे नातं रक्षाबंधन हया सणानिमित्त बांधले गेले. रक्षा व बंधन हे दोन शब्द मिळून हा शब्द तयार झाला आहे. रक्षा करण्याचे बंधन म्हणजे रक्षाबंधन होय. भावाने आपल्या बहिणीची रक्षा करण्याचे वचनच होय. उत्तर भारतात जास्त प्रमाणात हा सण साजरा होतो. प्रत्येक धर्मात हे नाते मानले जाते. बहिणी ह्या सणाला भावाकडे जातात त्यांना रक्षा करण्याचा धागा बांधतात. जणू एक त्याच्यावर ते बंधन त्याने स्वत स्विकारलेले असते. त्या रक्षा करण्याच्या आठवणी करुन देण्याचा दिवस म्हणून हा सण साजरा होतो. किती छान भावना प्रकटीकरणाचा दिवस आहे हा विदेशात सापडत नाही. भारतात विविध धर्माचे लोक मित्र असतील तर ते आपल्या मित्राच्या बहिणीची आपण सुध्दा भाऊ आहे हे मानून बहिणीकडून राखी बांधुन रक्षाबंधन साजरे करतात.
आजच्या विखारी दुनियेत ह्या सणाने मानवी सहृदयता वाढीस लागते. परिवाराने हा सण नात्याची ओढ कायम करण्यासाठी साजरा करण्याचे ठरविलेले असतेच. आपली बहिण जी आपल्या परिवाराचा हिस्सा असून ती दुसर्यां परिवारात नात्याला स्नेहाचे वेष्टन देते. सर्व सोडून ती कोणतीही अपेक्षा न घेता. ही बहिण भावाची लाडकी असते. भावाला व बापाला ती लग्न करुन सासरी जातांना वेदना होतात. त्यांचे पहिल्यांदा अश्रू अनावर होतात. दु:ख लपविणारा माणूस पहिल्यांदा व्यक्त होतो ते पण अश्रूचा बांध फोडून…अशी लाडकी बहिणीला संरक्षण देण्याचे वचन देणारा सण असतो रक्षाबंधन…
आज तर गरज आहे असे नाते वाढण्याची, जोपासण्याची कारण डिजीटल युगात नाते विसरत चाललो आहोत. मोबाईल आपले नाते हिरावून घेत आहे. एकटे राहण्याची सवय वाढली आहे. नात्यातील ओल कोरडी होत चालली आहे. माणूस ह्या 5 जी च्या युगात नको तितका वेळ आभासी दुनियेला देत आहे. नात्या नात्याची आत्मीयता कमी होत आहे. सण माणसाला जोडून ठेवण्याचे काम करतात. वैज्ञानिक पाया असलेले सण समाजाने साजरे करावेत त्यातून विश्व बंधुत्वाची वृत्ती साकार झाली पाहिजे. समाजात होणारे स्त्रीवरील अन्याय तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे. कुणाचीही बहिण आपली बहिण आहे ही वृत्ती वाढीस लागली पाहिजे. छत्रपती राजे शिवाजी यांनी परधर्मीय स्त्रीला मान देऊन सन्मान केलेला आहे. माता जिजाऊ मातृसत्ताक पध्दतीने जगणारी राणी होती. सुनांनाही तेवढाच अधिकार माता जिजाऊ यांनी दिला. स्त्री पुरुष असा भेद ह्या घराण्यात दिसला नाही. पर स्त्री ला मातेसमान मानणारा राजा ह्या महाराष्ट्राने पाहिला. परिवाराला जोडून ठेवणारे सण योग्य उद्देश ठेऊन साजरे करुया…सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दीक शुभेच्छा!!
लेखन – एस. एच. भवरे
पत्रकार