प्रताप महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

0

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग आणि रुसा यांच्या संयुक्त विद्यमाने अर्थशास्त्र विषयातील रोजगारांच्या संधी या विषयावर प्रताप महाविद्यालयात दि 21 सप्टेंबर 2024 रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन श्री नितीन पाटील नियोजन अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नाशिक यांच्या हस्ते झाले यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ विजय तुंटे तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा डॉ संजय फड अर्थशास्त्र विभाग प्रमुख एस एन डी टी महीला विद्यापीठ मुंबई आणि प्रा डॉ विजय वाकोडे एस पी एम तात्यासाहेब महाजन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चिखली यांची उपस्थिती होती.
आपल्या उद्घाटनीय भाषणात श्री नितीन पाटील यांनी प्रताप महाविद्यालयांमधील स्वतः चा अनुभव सांगुन अर्थशास्त्र विषयाला स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून कोणकोणत्या शासकीय विभागांमध्ये संधी असते याची माहिती दिली.‌ विशेषतः वर्गात आणि पुस्तकात शिकलेल्या संकल्पनांचा प्रत्यक्षात काम करताना कसा फायदा होतो याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
पहिल्या सत्रात प्रा डॉ संजय फड यांनी विज्ञानातील श्रम, आणि कलेतील लावण्य यांच्या अकल्पित मिश्रणातून समस्त समाज जीवनासाठी एखाद्या सजीव स्मारकांची निर्मिती करु शकेल असे सामर्थ्य जोपासणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र विषय
असे सांगितले. अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या रोजगाराच्या संधी अर्थशास्त्रज्ञ, वित्तीय विश्लेषक, बाजार संशोधन विश्लेषण म्हणून उपलब्ध असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र शिकत असताना त्यातील गणितीय अर्थशास्त्र, संख्याशास्त्र आणि अर्थमिती यांचा विशेष अभ्यास केला पाहिजे यावर जोर दिला. तसेच विद्यार्थ्यांनी माहितीचे सादरीकरण आणि विश्लेषण कौशल्य विकसित करण्यासाठी टॅब्ल्यू (Tableau), मायक्रोसॉफ्ट पॉवर बी आय, आर, पायथन, एसपीएसएस अशा साधनांचा अभ्यास केला पाहिजे असे सांगितले. तसेच उपलब्ध असणाऱ्या विविध कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) साधनांचा वापर आपले ज्ञान आणि कौशल्य वृंधिगत करण्यासाठी केला पाहिजे असे सांगितले.
प्रा डॉ विजय वाकोडे यांनी आपल्या भाषेबरोबरच जगातील कुठलीही एक भाषा शिकावी ज्यामुळे आपण जागतिक ज्ञानाशी जोडले जातो आणि विदेशात रोजगारांच्या संधी उपलब्ध होतात असे सांगितले.
विशेषतः जापनीज भाषेविषयी बोलताना त्यांनी असे सांगितले की,
विद्यार्थ्यांनी जापनीज भाषेची पहिली किंवा दुसरी लेव्हल जरी पूर्ण केली तरी त्यांना जपानमध्ये तसेच भारतातही नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. जापनीज भाषेच्या एकूण पाच लेव्हल आहेत. सहा महिन्याचा

पहिल्या लेव्हलचा कालावधी संपल्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूट वडगाव बुद्रुक, पुणे येथे जपान फाउंडेशन द्वारे विद्यार्थ्यांची परीक्षा होते. एक ते दीड महिन्याच्या कालावधीत या परीक्षेचा निकाल लागतो. परीक्षेत पास झालेले विद्यार्थी दुसरी लेव्हल शिकण्यासाठी प्रवेश घेऊ शकतात किंवा नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. या परीक्षेला जेएलपीटी म्हणजेच ‘जापनीज लैंग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट’ असे म्हटले जाते. एन ५, एन ४, एन ३, एन २ आणि एन १ अशा प्रकारच्या या पाच लेव्हल आहेत. भारत सरकार आणि जपान सरकार यांच्यामध्ये २०१७ या वर्षामध्ये एक प्रकारचा करार झालेला असून या कराराअंतर्गत भारतातील विद्यार्थी जपान मध्ये टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्राम’ अंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील नवीन प्रकारचे तंत्रज्ञान शिकण्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून पाठवले जातात.

या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना एक लाख ऐंशी हजार ते दोन लाख पन्नास हजार जापनीज येन म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये एक लाख रुपये ते दीड लाख रुपयेच्या दरम्यान त्यांना प्रति माह वेतन मिळते. त्यासोबतच विमा, दवाखाना तसेच पेन्शन इत्यादी सुविधा प्राप्त होतात. अठरा वर्षे वय पूर्ण झालेले आणि बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी टीआयटीपी मध्ये जाऊ शकतात. जापनीज भाषा शिकल्यानंतर कन्स्ट्रक्शन सेक्टर, अग्रीकल्चर सेक्टर तसेच फुड प्रोसेसिंग सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर, हेल्थ सेक्टर या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होतात यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या भाषेचे ज्ञान आत्मसात करून चांगली नोकरी मिळवावी असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा डॉ एच डी जाधव यांनी केले तर प्रमुख अतिथींचा परिचय उपप्राचार्य डॉ विजय मांटे यांनी करुन दिला. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ योगेश तोरवणे उपस्थित होते. या कार्यशाळेला मा. प्राचार्य डॉ ए बी जैन सर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. विनोद नाईक यांनी केले तर आभार प्रा रफिक खाटीक सपकाळे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी विभागातील प्राध्यापक सचिन आवटे, सोनु सिंग पाटील, सुनिल सपकाळे, राहुल पाटील यांनी काम केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा डॉ कल्पना पाटील, रुसा आणि आयक्यूएसी समन्वयक डॉ एम पी भोळे प्रा डी आर चौधरी, ग्रंथालय प्रमुख डी आर पाटील, प्रा तडवी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!